जमिनीचा सामू/ pH Level

| 29 Mar 2024 | 186 |

नमस्कार शेतकरी बांधवांनो,


शेती करताना जमिनीचा सामू हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. सेंद्रिय शेतीमुळे जमीनीचा सामू सुधारतो किंवा जमिनीच्या आरोग्य पत्रिकेवरील सामू वरून जमिनीचे आरोग्य तपासले जाते.त्यावरून योग्य खत, पाणीचे नियोजन केले जाते. मातीचा pH महत्त्वाचा आहे कारण त्याचा परिणाम वनस्पतींना पोषक तत्वांच्या उपलब्धतेवर होतो. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही प्राथमिक पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात.कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे दुय्यम पोषक घटक आहेत जे वनस्पतीला कमी प्रमाणात आवश्यक असतात. झिंक आणि मँगनीज हे सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतीला अत्यंत कमी प्रमाणात आवश्यक असतात.बहुतेक दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता मातीला इष्टतम pH मूल्यावर ठेवून सहजपणे दुरुस्त केली जाते.


जमिनीचा सामू म्हणजे नक्की काय असते?
त्यावरून शेतीत काय उपाय योजना करता येतील ह्यावर आज आपण माहिती घेणार आहोत.

सामू म्हणजे pH लेवल. पी. एच. मूल्य किंवा सामू हे द्रावण आम्ल आहे वा विम्ल अल्कली ते मोजण्याचे एकक आहे. सर्वसाधारणपणे कुठल्याही पदार्थाचा सामू जर सात या अंकावर असेल तर तो पदार्थ उदासीन क्रिया दर्शवितो. (उदा. दूध, मूत्र, रक्त, लाळ, इ.) सातच्या खाली असणारे बिंदू आम्लता दर्शवितात (उदा. लिंबू, ऍसिड) , तर सातच्या वरील बिंदू हे अल्कली (विम्लता/ क्षारता ) दर्शवितात. (उदा. खारे पाणी, खाण्याचा सोडा, साबणाचे पाणी, इ. ) पी. एच. म्हणजे पोटेन्शिअल ऑफ हायड्रोजन (हायड्रोजनचे प्रमाण किंवा कारकता). पी. एच.ची संकल्पना डॅनिश रसायनशास्त्रज्ञ सोरन्सन (१८६८ - १९३९) याने मांडली. कोणत्याही पदार्थाचा सामू मोजण्यासाठी pH scale म्हणजेच पट्टी वापरली जाते. त्यात ० ते १४ आकडे असतात.


                                                                 


वर दिलेल्या चित्रामध्ये  ० त १४ आकडे आहेत. ह्यात २ भाग असतात. जर एखाद्या पदार्थच सामू जर ७ आला तर तो पदार्थ उदासीन (neutral अथवा  नॉर्मल ) आहे. जर सामू ७ च्या खाली म्हणजेच ० ते ७ च्या दरम्यान येतो, तर त्या पदार्थात आम्ल (acidic) जास्त आहे हे दर्शवते. जर सामू ७ च्या वर म्हणजेच ७ ते १४ च्या दरम्यान येतो, तर तो पदार्थ अल्कधर्मीय  (alkaline) आहे हे दर्शवते. पण ज्यावेळेस मातीचा सामू मोजला जातो तेव्हा ६.० ते ७.५ मध्ये सामू आला तर ती माती उदासीन/ नॉर्मल/ योग्य आहे असे मानले जाते. जर सामू ६.५ पेक्षा खाली गेला तर, माती मध्ये आम्ल जास्त आहे असे म्हटले जाते. तसेच जर सामू ८.५ पेक्षा जास्त असेल तर ती माती अल्कधर्मीय आहे असे मानले जाते.


               


- जमिनी मध्ये अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर सामूचा प्रभाव मोलाचा ठरतो. सामू ५.५  ते ८.५ च्या दरम्यान असल्यास अन्नद्रव्यांचा पुरवठा चांगला राहातो. 

- ५.५ पेक्षा कमी सामू असल्यास जमिनीत जास्त आम्ल असते. अशावेळी जमिनीतून पिकांना कॅल्शियम, मॉलिब्डेनम, स्फुरद, गंधक व नत्राची उपलब्धता कमी राहाते. 

तसेच लोह, एल्युमिनीयम, मँगेनीज, तांबे व जस्त यांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते. लोह, मँगेनीज व एल्युमिनियमचा पिकावर अनिष्ट परिणाम होतो. स्फुरद मात्र स्थिर स्वरूपात जाऊन त्याची उपलब्धता कमी होते. 

- सामू ८.५ पेक्षा जास्त असल्यास सोडियमचे क्षार वाढतात. बोरॉनचे प्रमाण वाढते व ते पिकास हानीकारक ठरू शकते.  जमिनीतून पाण्याचा निचरा बरोबर नसेल, तर अशावेळी जमिनी चोपण होतात. म्हणजेच पिक लागवडीस अयोग्य ठरतात. अशा जमिनीत लोह, जस्त, तांबे, मॅंगेनीज यांची उपलब्धता कमी होते.


सामू वाढवण्यासाठी उपाय:

ज्या जमिनीचा सामू आम्लता दर्शवितो, अशा जमिनीस मात्र चुनखडी देऊन आम्लता कमी करता येते. म्हणजेच सामू वाढवता येऊ शकतो. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. काही प्रकारचा चुना (कॅल्शियम कार्बोनेट) असलेली सामग्री वापरणे, जसे कि जमिनीवरील चुनखडी आणि लाकडाची राख मातीचे पीएच वाढवू शकते.चुनखडी जितकी बारीक असेल तितकी ती अधिक वेगाने प्रभावी होते.मातीचा सामू चे  नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या मातीत  वेगवेगळ्या प्रमाणात चुना लागेल.लाकडाच्या राखेमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि फॉस्फेट, बोरॉन आणि इतर पोषक घटक कमी प्रमाणात असतात.चुनखडीइतके प्रभावी नसले तरी ते वारंवार वापरल्याने मातीचे पीएच कमालीचे वाढू शकते.


सामू कमी करण्यासाठी उपाय:  

ज्या जमिनीत विम्लता जास्त दर्शवितो, अशा जमिनीचा निचरा करून विम्लता कमी करून सोडियम व क्षार कमी करू शकतो. अशा जमिनीस सेंद्रिय खते देऊन त्याचा सामू कमी करता येतो.अशा जमिनीचा सामू कमी करण्यासाठी प्रथम निचरा सुधारावा लागतो. त्यामुळे क्षार कमी होतात. तसेच जिप्सम, सेंद्रिय खत, गंधक इत्यादींचा वापर करून जमिनीची सुधारणा होऊ शकते.अमोनियम-आधारित खते आणि सेंद्रिय पदार्थांव्यतिरिक्त, ॲल्युमिनियम सल्फेट आणि सल्फर हे मातीचे पीएच कमी करण्यासाठी  सामान्य पणे  वापरले जातात. ह्या मध्ये ॲल्युमिनियम सल्फेटला प्राधान्य दिले जाते कारण ॲल्युमिनियम सल्फेट हे ॲल्युमिनियममुळे जमिनीत विरघळताच मातीचा पीएच बदलतो. तथापि, ॲल्युमिनियम सल्फेट हे खूप जास्त झाल्यास बरेच रोपासाठी विषारी ठरू शकते. सल्फरचा परिणाम होण्यास थोडा वेळ लागतो कारण त्याचे मातीतील जीवाणूंद्वारे सल्फ्यूरिक ऍसिडमध्ये रूपांतर करणे आवश्यक असते.


pH कुठे तपासता येईल:

बाजारामध्ये मिळणारे किट वापरून तुम्ही तुमच्या मातीचे pH स्वतः तपासू शकता. हे किट तुलनेने स्वस्त आणि वापरण्यास सोपे आहेत आणि मातीचे pH चे चांगले संकेत देतात.परंतु सर्वोत्तम परिणामांसाठी, तपशीलवार विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत मातीचा नमुना पाठवा.

तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा सामू किती आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे आणि तो आवाक्यात ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणेही आवश्यक आहे.


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List