हिरवळीचे खते

| 25 Mar 2024 | 238 |

नमस्कार शेतकरी बांधवानो,

        सध्याच्या जागतिकीकरणामध्ये अन्न धान्य पुरवठा करण्यासाठी रासायनिक खतांचा अमर्याद वापर आपण करत आहोत. परंतु रासायनिक खतांचे बरेच दुष्परिणाम आजकाल अधोरेखित होत आहेत. रासायनिक  खतांमुळे जमिनीची सुपीकता व पर्यायाने उत्पादकता कमी होत आहे. सेंद्रिय कर्ब हे जमिनीचा अत्यंत महत्वाचा गुणधर्म असून त्याचे १ टक्क्या पेक्षा जास्त प्रमाण जमिनीत असणे गरजेचे आहे. परंतु सध्या त्याचे प्रमाण ०.३ ते ०.४ जमिनीच्या पृथकरणामध्ये आढळून येत आहे. अशा वेळी आपण सेंद्रिय शेतीचा आधार घेऊन जर सुपीकता वाढवू शकतो आणि पर्यायाने जमीन व पर्यावरणातील सर्व घटकांचे आरोग्य राखू शकतो.

        सेंद्रिय खतांमुळे जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढते. जमिनीची जडण घडण नीट होते, पाण्याचा निचरा योग्य होतो व हवा खेळती राहते. शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत व इतर सेंद्रिय खते पिकांना जास्त प्रमाणात लागतात. अशा वेळी हिरवळीचे खत एक पर्यायी खत म्हणून वापरू शकतो. तर चला मग पाहूया हिरवळीच्या खताबद्दल माहिती.

हिरवळीचे खत म्हणजे काय?

हिरवळीचे खत म्हणजे  हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांचं कोवळ्या फांद्या अथवा जमिनीमध्ये पेरून वाढलेली पिके फुलोऱ्यावर आली असताना शेतात नांगरून गाढून एकजीव करणे. त्यानंतर वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांमधून तयार झालेल्या खतास हिरवळीचे खत असे म्हणतात. 

हिरवळीच्या खतांचे प्रकार :

१. जागच्या जागी पीक उगवून केलेले हिरवळीचे खत

२. हिरव्या कोवळ्या पानांचे खत


१. जागच्या जागी पीक उगवून केलेले हिरवळीचे खत:

ह्यामध्ये ताग/बोरू,  धैंचा , मूग, उडीद, गवार, चवळी, बरसीम, लसूणघास अशा द्वि दलीय पिकांचा समावेश होतो. हि पिके द्वि दल वर्गातील असल्यामुळे त्यांच्या मुळावर नत्र स्थिर करणारे जिवाणू असतात. ह्या पिकांमध्ये  फुलोरा येण्याआधी पिकासाठी आवश्यक अन्न द्रव्य मोठ्या प्रमाणात तयार होतात. हि पिके मातीत गाडल्यानंतर जमिनीचा सेंद्रिय कर्ब झपाट्याने वाढतो.

हि पिके कमी पाण्यावर येणारी असावेत व त्याची मुळे खोलवर जाणारी असावेत. त्या पिकांची जास्तीत जास्त पाने मिळतील व ती गाडल्यावर लवकर कुजणारी असावेत. जेणेकरून जास्त सुपीकता वाढवता येईल. यातील काही प्रकार आपण पाहुया.

अ. ताग:

ताग हे शेतात पावसाळी हंगाम आधी पेरावे. साधारण पाने ४० ते ५० दिवसात पीक फुलोऱ्यावर असताना जमिनीत गाडावे. कुजण्यासाठी पुरेसा ओलावा आणि तापमान असल्यास ३ ते ४ आठवड्यांत कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते. 

-कमी कालावधीत जलद वाढणारे आणि भरपूर पाला देणारे पीक आहे. द्विदल वर्गातील असल्याने वातावरणातील नत्र कमी कालावधीत घेण्याची क्षमता या पिकात असल्याने नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.

- तागाच्या फांद्या कोवळ्या आणि लुसलुशीत असल्याने, तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने कुजण्याची प्रक्रिया जलद होते. 

- पिकांची मुळे खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेतली जातात आणि पीक गाडल्यानंतर वरच्या थरात मिसळली जातात.

- जमिनीतील अन्नद्रव्य, हयुमस, फल्वीक अ‍ॅसीड, सेंद्रिय कर्ब आणि नत्र वाढविण्यासाठी तागाचा फायदा होतो. 

ब. धैंचा 

हे उत्तम हिरवळीचे पीक आहे. या वनस्पतीच्या मुळावर तसेच खोडावर ही गाठी निर्माण होतात. यामध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाचे प्रक्रियेने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. या वनस्पतीच्या मुळावर गाठी निर्माण होण्याची क्षमता इतर द्विदल वनस्पती पेक्षा पाच ते दहा टक्के जास्त आहे. पाणी साचून राहणाऱ्या दलदलीच्या, कोरड्या किंवा क्षारयुक्त जमिनीतसुद्धा धैंचा  पीक वाढू शकते. पावसाळ्याच्या सुरवातीला बियाणे पेरावे. पीक  ४० ते ५० दिवसात फुलोऱ्यात असताना जमिनीत नांगराने गाडावे. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण 0.42 इतके असते. ह्या पिकापासून हेक्टरी ६० ते 7० किलो नत्र मिळते.

क. इतर द्वि दलीय वर्गातील पिके:

मुग, चवळी, उडीद, सोयाबीन, मटकी, गवार इत्यादी पिके फुलोरा आधीसुद्धा गाढून चांगला फायदा मिळू शकतो. मात्र या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर सर्व अवशेष जमिनीत गाडल्यास त्याचा चांगला फायदा होतो. या पिकांचे अवशेष जमिनीत लवकर कुजतात.


२. हिरव्या कोवळ्या पानांचे खत:

ह्या मध्ये गिरीपुष्प, जंगली धैंचा , सुबाभूळ, शेवरी, करंज, मोगली इत्यादी झाडांचा समावेश होतो. ह्या झुडुपांची व झाडाची पाने,कोवळ्या फांद्या जमिनीवर पसरून नांगरणी च्या वेळी जमिनीत गाडतात. हि झाडे शेताच्या बांधावर अथवा पडीक जागेवर लावून हिरवळीच्या खतासाठी वापरता येतात. त्यामुळे जिथे मुख्य पीक घ्याचे आहे तेथे हिरवळीच्या खताची लागवडी साठी वाट पाहावी लागत नाही. त्यामुळे लागवडी साठी हंगाम वाया जात नाही. यातील काही प्रकार आपण पाहुया.

१. गिरी पुष्प:

गिरिपुष्प हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात वाढणारे हिरवळीचे पीक आहे. या झाडाच्या पानांमध्ये साडेआठ टक्के कर्ब,0.40 टक्के नत्र असते. या वनस्पतीच्या बांधावर लागवड करून त्याची पाने वरचेवर जमिनीत मिसळता येतात. याशिवाय इतर वनस्पतींच्या तुलनेत या पिकाच्या पानात नत्राचे प्रमाण भरपूर असते. गिरी पुष्पाची लागवड शेताच्या बांधावर किंवा ओढ्याच्या व नाल्याच्या काठावर करावी. पूर्ण वाढलेल्या झाडापासून छाटणी केल्यावर २५ ते ३० किलो पाला मिळातो. हा पाला जमिनीत गाडल्या नंतर १५ दिवसात कुजल्यामुळे पिकास अन्न द्रव्य उपलब्ध होतात.

२. सुबाभूळ :

हे हिरवळीचे खत तसेच जैविक बांध म्हणून कोरडवाहू विभागात वापरतात. सुबाभूळ हे बांधावर २.५ ते ३ फूट उंच ठेवावे व प्रत्येक वर्षी हिरवा पाला व कोवळ्या फांद्या मशागती आधी जमिनीवर पसरून मिसळावे. त्यामुळे पिकांना २५ किलो नत्र उपलब्ध होते.


हिरवळीच्या खतांचे गुणधर्म:

- जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो.

- मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते. उपयुक्त सुक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते.

- जमिनीची भौतिक स्थिती सुधारते. अन्य मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.

- हिरवळीच्या खतांच्या मर्यादा : लागवडीसाठी क्षेत्र, कालावधी व पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. बियांचा खर्च वाढतो. आंतरपीक म्हणून घेताना मुख्य पिकांशी स्पर्धा करू शकतात.


तर हि होती हिरवळीच्या खताबद्दल माहिती. आपणास माहिती कशी वाटली त्या बद्दल प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. 


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List