शेतीसाठी वापरायची अवजारे

| 22 May 2023 | 628 |

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

    आता उन्हाळा संपून खरीप हंगाम चालू होईल. काही ठिकाणी पेरणी पूर्व शेत कामांची लगबग सुरु झाली आहे. त्यापूर्वी आपण आज पाहणार आहोत शेत मशागती साठी लागणारी अवजारे.

खुरपे : हे लोखंडी पात्यांचे अर्धचंद्रकार असते. याची मूठ लाकडाची असते. खुरपे म्हणजे शेतात 'खुरपणी'साठी वापरण्यात येणारे एक साधन आहे. शेतातील तण किंवा गवत काढण्यासाठी गावाकडील स्त्रिया याचा उपयोग करतात. हा विळ्याचा एक भाग आहे. परंतु खुरपे याला धारदार पाते नसते. झाडामधील गवत काढ्ण्यासाठि याचा उपयोग करतात.हे लोखंडा पासून बनवलेले एक शेतातील अवजार आहे.

मोठे खुरपे : उंच वाढलेले गवत, धान्य व भाजीपाला कापण्यासाठी मोठ्या खुरपाचा वापर हा केला जातो.

खुरपी : ही खुरपी ॲल्युमिनिअमची अथवा लोखंडाची असून अनेक आकारांत बाजारात उपलब्ध असते. टोपल्यात माती भरण्यासाठी व माती काढण्यासाठी हिचा वापर होतो.

सिंकी : म्हणजे खुरपे लावलेला लाकडी दांडा होय. झाडाच्या उंच शेंडयावरील फांद्या काढण्यासाठी या खुरपे लावलेल्या दांड्याचा वापर करतात.

कोयता : हा लोखंडी व जाड असतो, एका बाजूला धार असते व याला लाकडाची मूठ असते. झाडाच्या छोट्या फाद्या तोडण्यासाठी हा वापरतात.

कुऱ्हाड : हे पुढे पाते असलेले लांब लाकडी दांड्याचे अवजार आहे. कुऱ्हाडीने झाडाच्या मोठ्या फाद्या तोडता येतात किंवा लाकडे फोडता येतात.

कुदळ : मुरमाड व कठीण जमीन खोदण्यासाठी कुदळ वापरतात. कुदळीलाच टिकाव म्हणतात. याला दोन टोके असलेले पाते असून पात्याच्या मधोमध काटकोनात जोडलेला लाकडी दांडा असतो. कुदळीचा वापर शेती व स्थापत्य अभियांत्रिकीत जमीन खोदण्यासाठी केला जातो.याचे एक टोक टोकेरी तर दुसरे टोक पातळ असते.

फावडे : जमीन उकरण्यासाठी, माती उचलण्यासाठी, माती समांतर करण्यासाठी फावड्याचा वापर केला जातो.

नांगर : नांगर म्हणजे शेतात नांगरणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांच्या साहाय्याने हे चालविले जाते. याचा उपयोग सरी (लांबट वाफे) तयार करण्यासाठीही केला जातो. नांगराद्वारे जमीन नीट उकरली जाते. नांगर पूर्णपणे लाकडी किंवा पूर्णपणे लोखंडी असतात. काही नांगर लाकडाचे असून त्यां खाली लोखंडी फाळ लावलेला असतो..काही नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो.त्याद्वारे जमीन नीट उखरली जाते. आधुनिक काळात नांगरणी ही ट्रॅक्टरनी केली जाते.ट्रॅक्टर आल्यापासून नांगर नाहीसे झाले.

अ‍ऊत : औत असेही म्हणतात. हे लाकडाचे असते. याला समोर ओढण्यासाठी एक किंवा दोन बैल जोडायला आडवी काठी असते, आणि मागे लोखंडी टोक असते. अ‍ऊताच्या खालच्या भागाला फाळ असे म्हणतात. फाळ जमीन उकरते व जमीन नांगरली जाते.

गोफण : शेतीतील धान्य पक्षांनी, प्राण्यांनी खाऊ नये म्हणून त्यांना दगड मारून पळविण्यासाठी वापरण्यात येणारे एक मानवचलित उपकरण.. हे गोफासारखे विणलेले असते. याच्या दोन दोऱ्यांच्या मध्ये असलेल्या विशिष्ट जागेत दगड ठेवतात. त्यानंतर गोफण हातात धरून वेगाने स्वतःचे डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरविली जाते.आवश्यक वेग आल्यावर मग त्यातील एक दोरी सोडतात.. त्यामुळे दगड वेगाने सुटतो आणि नियोजित जागी जाऊन पक्षी, प्राणी यांना पिकाची नासाडी करण्यापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

डवरा : म्हणजे शेतात डवरणीसाठी वापरण्यात येणारे अवजार आहे. जे बैलांच्या साहाय्याने चालविले जाते. 

तिफण : शेतीसाठी वापरण्यात येणारे एक अवजार आहे. याच्या साहाय्याने बियांची पेरणी होते. शेतातून फिरता फिरता याच्यातून बिया खाली नंगरलेल्या सरींमध्ये पडतात. त्यांवर माती ढकलल्यावर पेरणी पूर्ण होते.

कुळव : शेतजमीन नांगरल्यानंतर निघालेली ढेकळे फोडून तणकटे मोकळी करणे, जेणेकरून ती वेचून जमीन स्वच्छ करता येईल आणि माती भुसभुशीत करण्यासाठी कुळवाचा वापर केला जातो.

हँडपंप : या पंपाची बॉडी व इतर पार्ट्स पितळेचे बनलेले असतात. यास कीटकनाशक फवारणीचा पंप देखील म्हणतात. रोपांवर पडलेली कीड, किडे व पतंग नष्ट करण्यासाठी हँडपंपाचा वापर केला जातो.

कटर : हा कटर कात्रीसारखा दोन पात्यांचा असतो. गवत कापण्यासाठी या अवजाराचा वापर केला जातो.


मित्रांनो, माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. लवकरच नवीन विषयाची आपण माहिती घेऊ तोपर्यंत धन्यवाद !!


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List