बी-बियाणे आणि घ्यावयाची काळजी

| 30 May 2021 | 2596 |


नमस्कार मंडळी,

सध्या खरीप हंगाम आपल्या दारात उभा आहे. तर मान्सूनची सुद्धा आगेकूच चालूच आहे. याचबरोबर आपले शेतकरी बंधू खरिपाच्या तयारीत व्यस्त आहे. यासाठीच आज आपण बियाणे खरेदी करताना कोणती दक्षता घयायची हे पाहूया. 

भारत सरकारने बी- बियाणांसाठी भारतीय बियाणे कायदा – १९६६ नावाचा कायदा  सर्व भारतात 1 ऑक्‍टोबर 1969 पासून अंमलात आणला आहे.पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्‍ध करून देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. हा कायदा सर्व भारतात लागू असल्‍यामुळे यातील सर्व नियम, अटी, याबाबत सर्व राज्‍यात एकसारखेपणा (समानता) आहे. या कायद्यानुसार सर्व देशात आणि देशाच्‍या निरनिराळ्या भागासाठी किंवा स्‍थानिक दृष्‍ट्या महत्‍त्‍वाच्‍या जाती, पिके व पिकांच्‍या अधिसूचित जाती (Notified Variety) म्हणून जाहीर केल्‍या जातात. त्‍या जातींच्‍या उत्‍पादन व विक्रीपुरताच हा कायदा लागू असतो. अधिसूचित जातीच्‍या बियाण्‍याची विक्री करताना अगर बियाणे विक्रीसाठी ठेवताना विक्रेत्‍यांना या कायद्यातील अटींचे व तरतूदीचे पालन करणे आवश्‍यक आहे,

शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घेण्याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शेतकरी बांधवांनी बियाण्याची खरेदी करताना काय दक्षता घ्यायला हवी ते पुढिल प्रमाणे

१. आपल्या परिसरातील कृषी विभाग येथील कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ सोबत चर्चा करून नवीन तसेच सुधारित, संकरित वाणाची माहिती घ्यावी. उत्तम प्रतीचे खात्रीशीर व नोंदणीकृत बियाणे विक्रेत्याकडून नावाजलेल्या कंपनीचे बियाणे खरेदी करावे. पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी. शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तिथून ते खरेदी करावे. बियाण्याच्या पिशवीला प्रमाणीकरण यंत्रणेने बियाण्याच्या गुणवत्तेविषयी असणारी (खुणचिट्ठी) टॅग लावलेला असतो तो तपासून पाहणे. बियाण्याच्या बॅगवर माहिती छापलेले असते. त्याविषयी माहिती व्यवस्थित वाचून तपासून घ्यावी. बियाणे खरेदी करताना हा टॅग खूप महत्त्वाचा असतो.

२.  बिलात पिक, वाण लॉट क्र., वजन, अंतिम मुदत, कंपनीचे पूर्ण नाव नमूद असले पाहिजे. कृषी केंद्रधारकाने पक्के बिल न दिल्यास तत्काळ कृषी कार्यालयात संपर्क करावा. बियाणे पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासून घ्यावे.

 पीक पैदासकरांनी विकसित केलेले नवे संकरित अथवा सुधारित वाण शेतकऱ्यापर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचाव्यात, यासाठी त्यांचे बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या चार टप्प्यात घेतली जाते. त्यामध्ये

१) मूलभूत बीजोत्पादन

२) पायाभूत बीजोत्पादन

३) प्रमाणित बीजोत्पादन

४) सत्यप्रत बीजोत्पादन

असे टप्पे आहेत. यालाच बियाण्याचे प्रकार असेही म्हणता येईल.

बियाण्याच्या बॅग वरील खुणचिट्ठी:- अधिसूचित जातीच्या बियाण्याची विक्री करताना बियाण्याच्या बॅगवर बियाणे कायद्यामध्ये निर्देशित केलेल्या बियाणे प्रतिच्या कमीत कमी मूल्याच्या दर्जा दाखवणारी माहिती टॅग असणे आवश्यक आहे. बियाण्याच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे टॅग प्रमाणित करण्यात आले आहेत. यामध्ये पायाभूत बियाण्यासाठी पांढरा, प्रमाणित बियाण्यासाठी निळा, मूलभूत बियाण्यासाठी पिवळ्या रंगाची (खुणचिट्ठी) लावलेली असते. सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाचा टॅग असतो. त्यावर खालील माहिती असणे आवश्यक आहे.

१- पिकाचे नाव

२- जाती आणि प्रकार

३- गट क्रमांक

४- बीज परीक्षणाची तारीख

५- उगवणशक्ती टक्के

६- शुद्धतेचे प्रमाण

७- पिशवीतील बियाण्याचे एकूण वजन

८- बियाण्याचा वर्ग

९- बियाण्याचा सार्थ कालावधी

१०- विक्रेत्याचे नाव आणि पत्ता

११- बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांची सही आणि हुद्दा याचा समावेश असतो.


याशिवाय बियाण्यास कीड किवा रोग प्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत. कीडनाशकाची नावे ठळक अक्षरात आणि माणसे, जनावरे, पक्षी यांच्या खाण्यास अयोग्य असा खुलासा त्यात असला पाहिजे.

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी:-

१. बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्या पावतीवर खरेदी करणाऱ्या चे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी करून पावती घ्यावी.

२. बियाणे नेहमी परवानाधारक कृषी केंद्र विक्रेत्याकडूनच घ्यावे.

३. बियाण्याची वैधता तपासणी दिनांकापासून ९ महिने असते तर नूतनीकरण केलेल्या बियाण्याची वैद्यता ६ महिन्यांपर्यंत असते. याबाबी पाहूनच बियाणे खरेदी करावे.

४. बियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवर दिलेली माहिती तपासून पहावी. त्यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवणक्षमता, भौतिकशुद्धता, बियाण्याचे चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे.

५. प्रमाणित बियाण्याच्या खुणचिट्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी.


मित्रांनो आपल्याला हि माहिती कशी वाटली हे खाली दिलेल्या comment बॉक्स मध्ये नोंदवा. लवकरच आपल्यासाठी नवीन विषय घेउन येईन तो पर्यंत धन्यवाद !!!



  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List